महाराष्ट्र विधानसभा २०१९ : शरद पवार म्हणतात खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात तर खडसे म्हणतात गेल्या तीन वर्षात कोणत्याही पवारांशी भेट नाही !!

‘भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. पवार यांच्या या वक्तव्यामुळं खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आलं आहे. तर खडसे यांनी पवारांच्या या वक्तव्याचे खंडण केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि , ‘तीन महिन्यांत काय, तीन वर्षांत कोणत्याही पवारांशी माझी भेट झालेली नाही. भाजप सोडण्याचा असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही,’ असं खडसे यांनी स्पष्ट केलं.
वास्तविक पाहता एकनाथ खडसे गेल्या तीन वर्षात माझी कोणत्याही पवारांची भेट झाली नाही असे सांगतात मात्र ते खरे नाही. डिसेंबर २०१७ मध्ये जळगावातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात अजित पवार आणि खडसे यांची एकत्रित हजेरी होती . या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी , नाथाभाऊंनी माझ्या कानात काय सांगितले आहे ते मी सांगणार नाही , माही तर भाजपवाल्यांना झोप लागणार नाही अशा कोपरखळ्या मारल्या होत्या. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही , माझ्या मानतात जे आहे ते मी अजितदादांच्या कानात सांगितले आहे असे म्हटले तेंव्हा कार्यक्रमात एकाच हशा पिकाला होता. तरीही खडसे गेल्या तीन वर्षात आपण कोणत्याही पवारांशी बोललो नसल्याचे सांगत आहेत.
चर्चेचा मुद्दा असा आहे कि, भाजपनं जाहीर केलेल्या उकोणत्याही मेदवार याद्यांमध्ये खडसे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळं ते नाराज असून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्यावर मोठा दबाव येत आहे. नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी जळगावच्या वाटेवर असल्याचेही सांगितले जात आहे. हे सगळं सुरू असतानाच शरद पवार यांनी आज खडसे संपर्कात असल्याचं वक्तव्य केल्यामुळे या चर्चेतील रंगात वाढली आहे.
ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व राष्ट्रवादीचे नेते जीतेंद्र आव्हाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पवार स्वत: उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला योग्य संधी मिळाली नाही की तो पर्यायाच्या शोधात असतो. खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत,’ असं ते म्हणाले. तसंच, विजय नाहटा यांचा जन्मच बारामतीमध्ये झाला होता, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.