महाराष्ट्र विधानसभा २०१९ : अखेर नितेश राणे यांनी स्वीकारले भाजपचे सदस्यत्व , उद्या ते दाखल करतील आपली उमेदवारी

कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी अखेर भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राणे परिवार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र शिवसेनेने कुडाळ-मालवण या मतदारसंघासाठी वैभव नाईक यांना एबी फॉर्म दिल्यामुळे नारायण राणेंना ही जागा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर आज फक्त नितेश राणे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उद्या ते आपल्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.
नितेश राणे यांनी कणकवली येथील भाजप कार्यालयात जाऊन सदस्यनोंदणीचा अर्ज भरला. यावेळी स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नितेश राणे यांनी कोकणासह संपुर्ण महाराष्ट्रात पक्षाला ताकदवान बनवू अशी घोषणा केली आहे. कोकणात भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल, यासाठी प्रयत्न करु, असेही राणे म्हणाले.