महाराष्ट्र विधानसभा २०१९ : केवळ छोटा राजनचा भाऊ आहे म्हणून दीपक निकाळजे यांचे रिपाइंचे दिलेले तिकीट कापले !!

भाजप -सेना महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ६ जागा मिळाल्यानंतर फलटण येथून दीपक निकाळजे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी केली जात होती. परंतु दीपक निकाळजे हे केवळ अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे भाऊ आहेत म्हणून त्यांच्यावर टीका झाल्याने त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने काल दिलेलं हे तिकीट आज मागे घेतलं आहे.
सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधून दीपक निकाळजे निवडणूक लढवणार होते. आता या जागेवर रामदास आठवलेंनी नवा उमेदवार दिला आहे. डॉनच्या भावाला तिकीट दिलं अशा बातम्या आल्यानं त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा आहे. मित्र पक्ष म्हणून रिपाइंला मिळालेल्या ६ जागांपैकी दीपक निकाळजे यांना फलटणची जागा देण्यात आली होती. विशेष म्हणजे रिपाइंचे सर्व उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असेही जाहीर करण्यात आले होते.
दीपक निकाळजे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच नवाब मलिक यांनी ‘मोदींच्या टीम मध्ये दाऊदचा माणूस आहे’, अशी टीका केली होती आणि माध्यमांनीही या बातम्या उचलल्या होत्या. ‘गुजरातमध्ये जसं गुंडांना पोसलं जात तसं महाराष्ट्रमध्येही होत आहे’, असंही ते म्हणाले होते. अखेर या टीकेमुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं. आता दीपक निकाळजेंच्या जागी दिगंबर आगाव यांना तिकीट देण्यात आलं आहे.
रिपाइंच्या जागा आणि उमेदवारांमध्ये मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई) – गौतम सोनावणे, फलटण (सातारा) : दिगंबर आगाव, पाथरी (परभणी) : मोहन फड, नायगाव (नांदेड): राजेश पवार, माळशिरस (सोलापूर), भंडारा (विदर्भ) आदींचा समावेश आहे. दरम्यान, माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचं समजतं. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.