भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या मानधरणीसाठी अजित पवार यांचे प्रयत्न

भाजपमधील एके काळचे दिग्गज आणि मातब्बर नेते एकनाथ खडसे सध्या त्यांचे तिकीट कापल्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी आपल्याला अखेरच्या क्षणी तरी तिकीट मिळेल या आशेवर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे परंतु भाजपकडून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही हे लक्षात घेऊन त्यांच्या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपला नियोजित बीड दौरा सोडून जळगाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हातात बांधतील काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही. मात्र जर खरोखरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असतील तर विधानसभा निवडणुकीना वेगळी कलाटणी मिळू शकते.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत बहुतांश उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र एकनाथ खडसे यांना मात्र अद्यापपर्यंत तिकीट देण्यात आलेलं नाही. एकनाथ खडसे यांनी विधानसभा न लढता त्यांच्या सूनेनं लढवावी, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यामुळे नाराज खडसे दुसऱ्या पक्षाचाही विचार करू शकतात.