जमिनीच्या वादातून नगरमधील वकील आणि त्यांच्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या , आरोपीस अटक

अहमदनगर जिल्हा न्यायालयातील अॅड. संभाजी ताके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याची नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती गाव येथे निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी शरद शिवाजी ताके याला अटक केली आहे.
अॅड. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळ गाव आहे. ते सध्या पत्नी आणि दोन मुलांसह नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहतात. ते आज गावाकडे काही कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांच्या जमिनीचा वाद असून, ते प्रकरण नेवासे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
दरम्यान ते गावाकडे गेले असता त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला. अॅड. ताके यांच्याबरोबर असलेल्या सहकार्याची ओळख अजून पटलेली नाही. घटनास्थळी मोटारगाडी आढळल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले. या हत्याकांडामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.