काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी : ‘सपा’ला ३ तर अन्य मित्र पक्षांना किती जागा ?

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह संयुक्त पुरोगामी महाआघाडीकडून समाजवादी पक्षाला ३ जागा देण्यात आल्या आहेत. बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यासह दोन्ही पक्षांचे इतर नेते उपस्थित होते.
समाजवादी पार्टीला देण्यात आलेल्या तीन जागांमध्ये शिवाजीनगर, भिवंडी पूर्व आणि औरंगबाद पूर्व या जागांचा समावेश आहे. यावेळी चव्हाण म्हणाले, काही काळापूर्वी समाजवादी पक्षाशी आमची कटुता निर्माण झाली होती मात्र, ती आता दूर झाली आहे. व्यापक आघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. दरम्यान, आघाडीतील मित्रपक्षांना योग्य जागा देऊ, असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
महाआघाडीकडून मित्र पक्षांना ३८ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यांपैकी शेतकरी कामगार पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीला ३ जागा देण्यात आल्या आहेत.