मला जे काही बोलायचे आहे ते दसरा मेळाव्यात बोलेन : उद्धव ठाकरे

नंदुरबारचे काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , सध्या जागा वाटपाबाबत काही ठिकाणी निर्णय घेणे गरजेचे आहे ते घेऊ, ४ तारखेला आम्ही या सर्वांतून मोकळे होऊ त्यानंतर सर्व गोष्टींवर ८ तारखेला दसरा मेळाव्यात मी बोलणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “राजकारणात आजवर युवकांना केवळ स्वप्ने दाखवली गेली ती स्वप्ने घेऊन ते आजही जगतायत. मात्र, आपली स्वप्नं साकारण्यासाठी युवकांनीच आता पुढे येऊन राजकारण आणि सरकार हातात घेऊन काम केलं पाहिजे. युवकांनीच आता देश आणि महाराष्ट्र घडवला पाहिजे.”
“शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले होते की, तू माझा मुलगा आहेस म्हणून शिवसेनेवर कधीही लादणार नाही आणि तुला जनतेने स्विकारले तरच तू यशस्वी होशील. या सूचनेनुसार आदित्य माझ्यापेक्षाही अधिक काम करतोय लोकांनी त्याला स्विकारलंय, त्यामुळे तो निवडणुकीला सामोरे जात आहे. ठाकरे घराण्याची सेवेची परंपरा आहे ही परंपरा आता आदित्य पुढे नेत असल्याने आनंद आहे. यासाठी सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या विकासाठी आणि युवकांच्या स्वप्नांसाठी तो लढतोय” असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.