मकरंद अनासपुरे यांच्या ” ‘गल्लीत गोंधळ,…’ चा उमेदवार प्रत्यक्षात अवतरला , अनामत भरण्यासाठी १० हजाराची चिल्लर आणली खरी पण झाला पाच हजाराचा दंड !!

निवडणुक कोणतीही असो या काळात काही गमती जमती न झाल्या तरच नवल. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे . त्याचे असे झाले कि , निवडणुक अर्जाची अनामत रक्कम भरण्यासाठी या अवलिया उमेदवाराने चक्क दहा हजारांची चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणली होती परंतु त्याला हि उमेदवारी चांगलीच महागात पडली. कारण अनामत रक्कम १० हजार अधिक प्लास्टिकच्या पिशवीत भरून रक्कम आणल्याबद्दल ५ हजाराचा दंड भरावा लागला .
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे या इच्छुक उमेदवाराचे नाव आहे. चर्चेत राहण्यासाठी तो करायला गेला एक आणि झाले भलतेच !! प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटात असा फार्स वापरण्यात आला होता त्याचीच पुनरावृत्ती मछिंद्र मुंगसे या उमेदवाराने करण्याचा प्रयत्न केला खरा पण तो अशा रीतीने अंगलट आला. चित्रपटाप्रमाणेच मच्छिंद्र मुंगसे या इच्छुक उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची चिल्लर आणली. त्यामुळे हजारो रुपयांची चिल्लर मोजता-मोजता निवडणूक अधिकाऱ्यांची बरीच तारांबळ उडाली.
हा सर्व प्रकार घाट असताना मुंगसे यांनी अनामत भरण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीतून चिल्लर आणल्याचे निवडणूक अधिकारी शाहूराव मोरे, व सहायक निवडणूक अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या लक्षात आले. त्यामुळे प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातली असतानादेखील प्लास्टिक पिशवी वापरल्यामुळे मुंगसे यांना सहायक निवडणूक अधिकारी तथा नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी पाच हजारांचा दंड केला. या दंडाची पावतीही मुंगसे यांना देण्यात आली असून त्यांच्याकडून तो वसूलही करण्यात आला.
विशेष म्हणजे हा दंड भरताना केवळ एक हजार रुपयांची चिल्लर मुंगसे यांच्याकडून स्वीकारण्यात आली. उर्वरित चार हजार रुपयांच्या मात्र नोटा घेण्यात आल्या. नियमाप्रमाणे चिल्लर स्वीकारण्यास मर्यादा असल्यामुळे केवळ एक हजार रुपयांची चिल्लर मुंगसे यांच्याकडून स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र, या सर्व प्रकारात अनामतसाठी चिल्लर घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे येणे इच्छुक उमेदवाराला महागात पडले अशी चर्चा रंगली होती.