महाराष्ट्र विधानसभा २०१९ : काँग्रेसच्या १०० जागांवर उमेदवार निश्चिती मात्र प्रतीक्षा भाजपच्या यादीची !!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली असून १२५ जागांपैकी १०५ जागांवरील उमेदवारांची नाव निश्चित करण्यात आली असल्याचे वृत्त असून उर्वरित १५ ते २० जागांवर येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याबाबतही विचार विनिमय सुरू असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या गोटातून वृत्त असे आहे कि , महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज छाननी समितीच्या बैठकीत आपल्या वाट्याच्या १२५ जागांपैकी १०५ जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली असून उर्वरित १५ ते २० उमेदवारांच्या नावांवर रस्सीखेच सुरू आहे.
छाननी समितीच्या शिफारशीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होऊन त्यात बऱ्याचशा उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तबही करण्यात आल्याचे समजते. मात्र, उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसला भाजपच्या यादीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे काँग्रेसची यादी सोमवारच्या आधी जाहीर होण्याची शक्यता नाही.
साताऱ्यात माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लाट आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला मोठा प्रतिसाद लाभल्याने या मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना उतरविण्याचा विचार सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत आणि माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवावी असा राष्ट्रवादीचाही आग्रह असल्याने त्यांनाच साताऱ्यातून तिकीट देण्यात येणार असल्याचंही विजय वडेट्टीवार म्हणाले.