मोटारसायकल दिली नाही म्हणून नशेखोरांनी केली तरुणाची हत्या

शहरातील काही नशेखोरांनी एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पाडेगाव कासम्बरीनगर भागात घडली आहे. दरम्यान, औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका आठवड्यात तरुणाची हत्या झाल्याची तिसरी घटना समोर आली आहे.
सय्यद जमीर सय्यद जहीर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. परिसराकतीलच काही ओळखीचे टवाळखोर नेहमी दुचाकी मागत असल्याने वैतागलेल्या जमीर ने त्यांना काही दिवसांपासून दुचाकी देणे बंद केले होते. या रागातून काही दिवसांपूर्वी त्याची दुचाकी फोडण्यात आली होती. मात्र, मंगळवारी रात्री काही नशेखोरांनी जमीरला कासम्बरी नगर भागात बोलावून बेदम मारहाण केली. नंतर धारदार शस्त्राने त्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पोलीस हत्येचा तपास करत आहेत.