शरद पवारांच्या समर्थनार्थ उद्या बारामती बंद , ईडीने नोंदविलेल्या गुन्ह्याचा निषेध

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी बारामतीत बुधवारी २५ सप्टेंबरला बंद पाळण्यात येणार आहे. विविध सामाजिक संघटनांनी या बंदचे आवाहन केले असून सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. सकाळी १० वाजता बारामतीतल्या शारदा प्रांगणात सगळ्यांना एकत्र जमा होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी याचा निवडणुकीत सहानुभूतीसाठी वापर करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर हा गुन्हा दाखल झालाय. यातल्या अन्य आरोपींमध्ये दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.
शरद पवारांचा खुलासा
“माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. बँकेकडून मला फोन आला, त्यात माझं नाव नसल्याची माहिती मला मिळाली.” राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “मी राज्य सहकारी बँकेशी संबंधित नव्हतो. मी कधीही बँकेचा संचालक नव्हतो. कुठल्याही बँकेच्या संचालक मंडळावर मी कधी नव्हतो. मी बँकेच्या निवडणुकीलासुद्धा कधी उभा राहिलो नव्हतो. ज्या संस्थेशी माझा कसलाही संबंध नाही, त्याच्यातल्या घोटाळ्यात मला गोवण्यात येत असेल तर काय बोलणार.”
“या बँकेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेशी माझा कधीही संबंध नव्हता. आता जी तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यात कर्ज देण्याच्या अनियमितपणाबद्दल तक्रार केली होती. कर्ज देण्याच्या प्रक्रियेशी माझा कसा संबंध? तरीही माझ्यावर केस करण्याविषयी निर्णय घेतला असेल तर धन्यवाद देतो. मी ज्या बँकेचा सभासदसुद्धा नाही. मग त्या बँकेच्या घोटाळ्याच्या गुन्ह्यात माझाही सहभाग कसा नोंदवला?” असा सवाल त्यांनी केला.