औरंगाबाद : पोलीस नाईक उमाकांत पद्माकर पाटील यांची आत्महत्या

पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक उमाकांत पद्माकर पाटील, वय ५२ यांनी पहाटे पाचच्या सुमारास बंजारा कॉलनी खोकडपुरा येथे आत्महत्या केल्याची घटना घडली. उमाकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील मुळ रहिवासी होते.
पाटील यांचा एक मुलगा दिल्लीला कंपनीत नोकरीला आहे. तर मुलीचा विवाह झालेला आहे. उमाकांत पाटील हे वाहतूक शाखेत कार्यरत असताना काही वर्षांपुर्वी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्याच गुन्ह्याची सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता होती.
दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर ते झोपी गेले होते. मात्र, पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या पत्नी झोपेतून उठल्या. तेव्हा उमाकांत पाटील हे खोलीत दिसत नसल्याने त्यांना पत्नीने आवाज दिला. पण ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्या दरवाजा उघडून बाहेर आल्या. तेव्हा पाटील यांनी जिन्याखाली गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पत्नीने आरडा-ओरड केली. त्यांचा आवाज ऐकूण शेजारी धावत आले. त्यानंतर पाटील यांना तात्काळ घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी क्रांतिचौक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून असून, पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.