महा जनादेश यात्रा नाशिक : बाबासाहेबांची राज्यघटना आणि कायद्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करून मोदींनी जय भीम, जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने केला समारोप

महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री नरेंद्र मोडी यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप ठरल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मोदींनी आपल्या सभेची सुरुवात रामापासून केली तर शेवट जय भीम , जय भवानी, जय शिवाजीच्या जय घोषाने केला. जम्मू –काश्मीर आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आठवण करून कायदा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याची विनंती केली आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारला विजयी करण्याचे आवाहनही केले.
दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या पंचवटीतील तपोवनात होत असलेल्या जाहीर सभेत कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी राज्य शासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसेच गुरुवारी सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याशिवाय राज्यात भडकलेल्या कांदा आंदोलनाचा फटका कार्यक्रमाला बसू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सभास्थळी जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात होती. या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली.
अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून न्यायालयावर विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्य केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणं आवश्यक आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत. सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ?. आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली . नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. यामध्ये यामध्ये महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गिरिश महाजन, उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच भाजपाचे राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. पंतप्रधान मोदी दीडच्या सुमारास दाखल झाले. मोदींनी या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बराचसा भाग हिंदीत होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंचवटीतील तपोवनातील सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याचे आगमन झाले. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भाषण करत होते. मोदी दाखल झाल्यानंतर सर्वात आधी चंद्राकात पाटील यांनी भाषण केले.
दुपारी सव्वा दोनच्या सुमार पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ‘प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या चरणस्पर्शाने पावन आणि आदिमाया आदिशक्ती महिषासुर मर्दिनी सप्तश्रृंगी मातेच्या निवासाने पवित्र अशा नाशिकाच्या या पावन धर्मभूमीला माझा शत: शत: नमस्कार,’ अशी मराठमोळी सुरुवात मोदींनी आपल्या भाषणाला केली. भाषणामध्ये मोदींनी फडणवीस यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना फडणवीस हे ऊर्जावान मुख्यमंत्री असल्याचे मत व्यक्त केले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवलं आहे. हा माझा सन्मान आहे,’ अशी भावना मोदींनी व्यक्त केली.