Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माजीमंत्री हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर , विजयसिंह मोहिते-पाटील प्रयत्नशील

Spread the love

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी आज (बुधवार) अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. कारण या मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जिंकलेली जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा नकार आहे.

राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटलांनी अकलूजला जात विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते -पाटील यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली. त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तर थेट भाजपमध्येच प्रवेश केला. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!