मित्रांसोबत मिळून केला प्रेयसीवर सामूहिक बलात्कार , विश्वासघात झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

प्रियकराने मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीने किटकनाशके पिऊन आत्महत्या केली. मागच्या शनिवारी २४ ऑगस्ट रोजी बंगलाच्या पूर्व मिदनापोर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. कोलकात्याच्या एसएसकेएम या सरकारी रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाला. प्रियकरानेच विश्वासघात केल्यानंतर पीडित तरुणीने विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
रुग्णालयात असताना तिची प्रकृती बिघडत गेली अखेर गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला. प्रियकराने २४ ऑगस्टला पीडित मुलीला घरातून बोलवून बाहेर आणले व तिला जवळच्या शेतात घेऊन गेला. तिथे त्याने व त्याच्या मित्रांनी मिळून पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर हादरुन गेलेल्या पीडित मुलीने विष प्राशन करुन जीवन संपवले.
आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहापैकी चार आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन आरोपीचाही यामध्ये समावेश आहे. तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.