नाही , नाही म्हणताना भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना सांगून टाकले , शिवसेनेत जातोय …

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीआधी आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. दोन दिवसात पक्षांतर करणार आहे, अशी कबुली कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी दिली आहे.भास्कर जाधव यांनी पक्षांतर करणार असल्याची कबुली दिली असली तरी भाजपमध्ये जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जाधव यांचा सेना प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.
चिपळूणमध्ये घेतलेल्या बैठकीत भास्कर जाधव यांची कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे.दरम्यान, भास्कर जाधव यांच्या पक्षांतराच्या निर्णयाने त्यांचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती आहे. येतील त्यांना सोबत घेऊ, जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल नाराजी नसेल, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील ज्येष्ठ नेते भास्करराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वार टीका केली. ‘मी याआधीच पक्षाकडे मुंबईचं अध्यक्षपद मागितलं होतं. पण पक्षाने तेव्हा माझं ऐकलं नाही,’ असं म्हणत भास्कर जाधव यांनी पक्षनेतृत्वार नाराजी व्यक्त केली होती. पण त्यानंतर आता भास्कर जाधव स्वत:च पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे.
भास्कर जाधव आणि नारायण राणे या कोकणातील दोन नेत्यांमध्ये सतत राजकीय संघर्ष होत असतो. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी भास्कर जाधवांनी शिवबंधन हाती बांधल्यास राणेंना कोकणात शह देण्यासाठी शिवसेनेची मदत होऊ शकते.