Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाकिस्तानने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा : परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते रवीशकुमार

Spread the love

पाकिस्तानने इतर देशांच्या अंतर्गत गोष्टीत नाक खुपसणं बंद करावं असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानने सत्य स्वीकारलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानी हवाई मार्ग बंद करण्यात आला नसून, नव्याने बदल केला जात आहेत. हवाई मार्ग सुरु असल्याची माहिती रवीश कुमार यांनी दिली आहे. दहशतवादाचा प्रसार करण्यास आता मदत मिळणार नाही म्हणूनच पाकिस्तान घाबरला आहे असं रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेण्याची धमकी पाकिस्तानने दिली असून त्यावर बोलताना रवीश कुमार यांनी सांगितलं की, “पाकिस्तानव्याप्त काश्मीरदेखील आमचाच आहे. आमच्या अंतर्गत गोष्टी संयुक्त राष्ट्राकडे नेण्याचा पाकिस्तानला कोणताच अधिकार नाही”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पाकिस्तानला भीतीचं वातावरण निर्माण करायचं आहे. जम्मू आणि काश्मीरचा विकास झाला तर तेथील लोकांची दिशाभूल करु शकणार नाही यामुळे पाकिस्तान चिडलेला आहे”. यावेळी समझोता एक्स्प्रेस आणि थार एक्स्प्रेससंबंधी बोलताना रवीश कुमार यांनी सांगितलं की, “पाकिस्तानने घेतलेला निर्णय एकतर्फी आहे. आमच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयावर पुनर्विचार करावा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे”. भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने भारत- पाकिस्तान दरम्यान धावणारी समझोता एक्स्प्रेसही स्थगित केली आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

दरम्यान पाकिस्तानच्या कुठल्याही थिएटरमध्ये कुठलाही भारतीय चित्रपट दाखवला जाणार नाही. भारतीय नाटके, चित्रपट किंवा तत्सम कलाप्रकारांवर पाकिस्तानात संपूर्ण बंदी राहील, असे पंतप्रधान इम्रान खान यांचे माहिती व प्रसारणविषयक विशेष सल्लागार फिरदौस आशिक अवान यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे.

रेल्वे सेवा स्थगित नसल्याचा भारताचा दावा
सुरक्षाविषयक कारण देऊन पाकिस्तानने गुरुवारी समझोता एक्स्प्रेस वाघा सीमेवर थांबवली. यानंतर भारतातून गेलेल्या वाहक व गार्ड यांनी ही गाडी भारताच्या सीमेतील अटारीपर्यंत आणल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिल्ली व लाहोर या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या या गाडीत ४८ पाकिस्तानींसह १७ प्रवासी होते. पाकिस्तानने भारतात जाणाऱ्या समझोता एक्स्प्रेसची सेवा स्थगित केली असल्याची माहिती पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना दिली. तथापि, ही सेवा स्थगित करण्यात आलेली नसल्याचे भारतातील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रेल्वे सेवा स्थगित करण्यात आलेली नाही. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि गार्ड यांच्या सुरक्षेबाबत चिंतेचे काही मुद्दे मांडले आहेत. आमच्या बाजूने परिस्थिती सामान्य असल्याचे आम्ही त्यांना सांगितले आहे, असे उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार म्हणाले.

मात्र समझोता एक्स्प्रेसची सेवा स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे रशीद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जोवर मी रेल्वेमंत्री आहे, तोवर समझोता एक्स्प्रेस धावणार नाही. या गाडीचे डबे आता ईदनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वापरले जातील, असेही ते म्हणाले. भारताकडे जाणाऱ्या गाडीत बसण्यासाठी प्रवासी लाहोर स्थानकावर प्रतीक्षेत असताना मंत्र्यांनी ही घोषणा केली. येते तीन ते चार महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. युद्धही होऊ शकते, मात्र आम्हाला युद्ध नको आहे. आमच्यावर युद्ध लादण्यात आले, तर ते अखेरचे असेल, अशी दर्पोक्ती रेल्वेमंत्र्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!