Good News : आरबीआयच्या रेपो दरात कपात केल्याने कर्जाच्या व्याजदरातही मोठी कपात

रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये सलद चौथ्यांदा कपात केल्याने सरकारी बँकांनी आपल्या कर्जांवरील व्याजदर घटवण्यास सुरुवात केली आहे. एचडीएफसी बँक या खासगी बँकेनंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, आंध्र बँक या बँकांनी एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेण्डिंग रेट्स) आधारित व्याजदर कमी केले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील व्याजदर १० टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे महाबँकेचा तीन व सहा महिने कालावधीच्या एमसीएलआर अनुक्रमे ८.३ व ८.४ टक्के झाला आहे. हे नवे दर आठ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत.
आयडीबीआय बँकेने विविध कालावधींच्या एमसीएलआरमध्ये .०५ ते .१५ टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे या बँकेच्या सहा महिने, एक वर्ष व तीन वर्षे मुदतीच्या कर्जांवरील व्याजदर अनुक्रमे ८.५, ८.८५ व ९.१ टक्क्यांनी कमी झाला आहे.
कॅनरा बँकेने सर्व मुदतीच्या कर्जांच्या एमसीएलआरमध्ये .१० टक्क्यांनी कपात केली असून यामुळे या बँकेचा एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर ८.५ टक्के झाला आहे.
आंध्र बँकेकडूनही मोठी कपात
आंध्र बँकेने एक वर्षापर्यंत मुदतीच्या कर्जांवरील एमसीएलआरमध्ये .२५ टक्क्यांची मोठी कपात केली असून त्यामुळे या बँकेचा एमसीएलआर ७.९५ टक्क्यांवर आला आहे.