Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घड्याळ काही चालत नाही, हात काही हलत नाही, २०२४ पर्यंत भाजपा प्रणित महायुतीला कुठल्याही प्रकारची चिंता नाही : आठवले

Spread the love

घड्याळ काही चालत नाही व हात काही हलत नाही. त्यामुळे विरोधक हे गलितगात्र झाले असल्याचे चित्र आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी जरी ते एकत्र आले तरी फार काही होणार नाही. मोदी जातीधर्माच्या पलीकडे राजकारण करत असल्याने २०२४ पर्यंत तरी भाजपा प्रणित महायुतीला कुठल्याही प्रकारची चिंता नाही, असे मत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले, राज ठाकरेंना सध्या काही ऊद्योग नाही, कसले काम राहिलेले नाही. त्यामुळे इव्हीएमच्या ते मागे लागलेत. ममता बॅनर्जींचे भेट घेण्याऐवजी पक्ष वाढवण्याचे काम करावे  तसेच विधानसभेला १ कॅबिनेट , १ राज्यमंत्री व ४, ५ महामंडळे मिळावीत. २२ जागांचे पत्र दिले आहे, १० तरी मिळाल्याच पाहिजेत.

राज ठाकरेंना काही उद्योगच राहिला नाही

ईव्हीएम विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देशभरातील नेत्यांची भेट घेत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन केले जाणार आहे. मात्र, त्या आंदोलनाचा काही एक फरक पडणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. “राज ठाकरे यांच्याकडे काही उद्योग राहिला नाही. म्हणून ते देशभरातील नेत्यांच्या भेट घेत आहे. नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यापेक्षा राज्यात मनसे कशी वाढेल याकडे राज ठाकरे यांनी लक्ष द्यावे,” असा सल्ला यावेळी रामदास आठवले यांनी दिला. ईव्हीएम बाबत राज ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी भूमिका मांडली.

पवारांना मीच सोडले , मग बाकीचे तरी कसे राहतील

भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेत आहे असा आरोप करण्यापेक्षा पक्षातील नेते सांभाळावेत असा सल्ला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिला आहे. “मीच त्यांना सोडले आहे, मग बाकीचे तरी कसे राहतील, ” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सध्या राज्यात पक्षांच्या नेत्यांच्या दौऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. सगळ्यांनी आपापला प्रचार करावा, तसेच एकमेकांवर खोटेनाटे आरोप करू नयेत. पक्षासाठी मत मागावीत. शिवसेना, भाजपा आणि रिपाइं एकत्र असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५० च्या वर जागा मिळणार नाहीत.

“शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत चांगले नेते आहेत. त्यांनी समाजातील अनेक चांगली काम केली आहेत. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांना आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून येणे कठिण वाटत आहे,” असे आठवले यावेळी म्हणाले. तसेच पक्ष बदलला तर सत्ता आणि आमदारकी राहू शकते ही भावना कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची चुकीची नाही. देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे, असे म्हणत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची आठवले यांनी पाठराखण केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!