पुढील महिन्यात आरबीआयकडून ही घोषणा होण्याची शक्यता

एनईएफटी आणि आरटीजीएसवर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क आकारणे बंद केल्यानंतर आता अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणारे शुल्क कमी करण्याचा आरबीआयचा विचार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील महिन्यात यासंबंधीची घोषणा होऊ शकते. एटीएम शुल्क आकारणीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं अहवाल तयार केला असून, त्यात शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे. ही समिती लवकरच हा अहवाल आरबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. एटीएम शुल्क आकारणे पूर्णपणे बंद करण्यात आले नसून, शुल्क कमी करण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. सध्या अन्य बँकांच्या एटीएमद्वारे निश्चित मर्यादेपर्यंत होणाऱ्या ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क आकारले जात नाही. मात्र, त्याहून अधिक वेळा पैसे काढल्यास शुल्क आकारले जाते. प्रत्येक बँकेने त्यासाठी स्वतःची एक रचना केलेली आहे. काही खासगी बँका सध्या तरी, मेट्रो शहरांमध्ये महिनाभरात सुरुवातीच्या तीन ट्रान्झॅक्शनवर शुल्क आकारत नाहीत. तर अन्य काही शहरांमध्ये पाच ट्रान्झॅक्शन मोफत आहेत. त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी २० रुपये अतिरिक्त शुल्क वसूल केले जाते.