ICC World Cup 2019 : सेमी फायनलमध्ये धोनी बाद झाल्याच्या धक्क्याने चाहत्याचा मृत्यू !!

आय सी सी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधील सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा झालेला पराभव हा अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. रवींद्र जाडेजा आणि धोनी यांनी साकारलेल्या भागीदारीमुळे भारत विजयी होईल, असे वाटत असताना धोनी धावबाद झाला. कोलकातामधील एका क्रिकेट चाहत्याला हा धक्का सहन न झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. काल झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता. कोलकातामधील सायकल दुकानदार श्रीकांत मैती (वय ३३) आपल्या दुकानात बसून मोबाइलवर हा सामना पाहत होता. अखेरच्या ११ चेंडूत भारताला विजयासाठी २५ धावा हव्या होत्या. धोनीला ४९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. तिसऱ्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. धोनी धावबाद होताच असंख्य क्रिकेटप्रेमींचे स्वप्न भंगले. अनेकांना हा धक्का सहन झाला नाही. श्रीकांतलाही हा धक्का सहन झाला नाही. धोनी बाद होताच श्रीकांतला चक्कर आली आणि तो दुकानात कोसळला. व त्याचा दुकानाताच मृत्यू झाला.
सायकलच्या दुकानातून मोठा आवाज आल्याने आम्ही मदतीसाठी दुकानात पोहोचलो. त्यावेळी श्रीकांत खाली पडलेला आम्हाला दिसला. आम्ही त्याला जवळच्या खानकूल हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे प्रत्यक्षदर्शी दुकानदार सचिन घोष यांनी सांगितले.