Uttar Pradesh : एक्स्प्रेस वेवर प्रवासी बस नाल्यात कोसळून २९ ठार, १६ जखमी

एक्स्प्रेस वेवर प्रवासी बस नाल्यात कोसळून २९ जण ठार झाले असून १६ प्रवासी गंभीर जखमी आहेत. लखनऊहून दिल्लीला जात असलेल्या बसचा सोमवारी मध्यरात्री आग्राजवळ अपघात झाला.
मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास सुमारे पन्नास प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस नाल्यात कोसळली. बस चालकाचा डोळा लागल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून सध्या बचाव कार्य सुरू आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे.