हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह !! घराणेशाही आणि जातीयवाद हेच सध्या ‘निकष’ असल्याचा ठपका

हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवर अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश रंगनाथ पाण्डेय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासंबंधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं आहे. न्यायाधीशांची नियुक्ती करताना कोणतेही निश्चित मापदंड नाहीत. घराणेशाही आणि जातीयवाद हेच सध्या ‘निकष’ आहेत, असा उल्लेख करत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दुर्दैवानं न्यायव्यवस्था घराणेशाही आणि जातीयवादात अडकली आहे. न्यायाधीशांच्या कुटुंबातील सदस्य असणे याच निकषावर पुढे न्यायाधीश होता येते. राजकीय कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं मूल्यांकन निवडणुकीत नागरिक करत असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. मात्र, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी आपल्याकडे कोणतेही निकष नाहीत, अशी खंत न्यायमूर्ती पाण्डेय यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील अनेक न्यायाधीशांकडे पुरेसे ज्ञान नसल्याचे ३४ वर्षांच्या सेवाकाळात पाहिले. न्यायव्यवस्थेला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत, अशी विनंती पाण्डेय यांनी मोदींकडे केली. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा वाद आणि इतर घटनांचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला. अनेक न्यायाधीशांकडे कायद्याचे पुरेसे ज्ञान नाही. वकिलांकडे न्यायप्रक्रियेबाबत माहितीचा अभाव आहे. कॉलेजिअम सदस्यांच्या पसंतीचे असणे या योग्यतेच्या आधारे न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते. हे खूपच दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.