पुण्यात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू

पुण्यात कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलं आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्येही मुलांचा समावेश आहे. मृत झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते, अशी माहिती समोर आलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत त्याच्या सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला असलेल्या इमारतीचं बांधकाम थांबवण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महापौरांनी मजुरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत जखमींची विचारपूसही केली. त्यानंतर त्यांनी बिल्डराला काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून त्यात पालिकेचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
बडा तालाब मस्जिद पसरिसरात अल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. या भिंतीला लागून मजुरांच्या कच्च्या झोपड्या होत्या. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. आल्कन स्टायलस या सोसायटीच्या बाजूला इमारतीचं काम सुरू होतं. इमारतीचा पाया बांधण्यासाठी ४० ते ५० फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या झोपड्या अल्कन स्टायलस या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून बांधण्यात आल्या होत्या. पण पावसामुळे सोसायटीची पार्किंगची संरक्षण भिंत खचून ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. बांधकाम प्रकल्प कोणाचा आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोंढव्यातील घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती पुण्याच्या माहपौर मुक्त टिळक यांनी दिली.
मृतांमध्ये १) आलोक शर्मा – २८ वर्षे २) मोहन शर्मा – २० वर्षे ३) अजय शर्मा – १९ वर्षे ४) अभंग शर्मा – १९ वर्षे ५) रवि शर्मा – १९ वर्षे ६) लक्ष्मीकांत सहानी – ३३ वर्षे ७) अवधेत सिंह -३२ वर्षे ८) सुनील सींग -३५वर्षे ९) ओवी दास – ६ वर्षे (लहान मुलगा ) १०) सोनाली दास – २ वर्षे (लहान मुलगी ) ११) विमा दास -२८ वर्षे १२) संगीता देवी -२६ वर्षे यांचा समावेश आहे . इतरांची नावे समजू शकली नाही . तर पूजा देवी – २८ वर्षे हि जखमी झाली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस दलातील अधिकारी आदी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. या समितीला आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून समितीने सादर केलेल्या अॅक्शन रिपोर्टनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच सीओपीच्या टीमकडून ऑडिटही केले जाणार असल्याचं पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
पावसामुळेच कोसळली भिंत- जिल्हाधिकारी
पुण्यात सुरु असलेल्या पावसामुळेच ही भिंत कोसळल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्याच बरोबर या दुर्घटनेला बांधकाम करणारी कंपनी देखील जबाबदार असल्याचे दिसत आहे. 15 जणांचा मृत्यू ही मोठी घटना आहे. सर्व कामगार हे बिहार आणि पश्चिम बंगालमधील आहेत. सरकारकडून त्यांनी मदत केली जाईल, असे ते म्हणाले.