दादर, मुंबई : अवघ्या १० रुपयाच्या वादातून भाजी विक्रेत्याने केला खून , ग्राहकावर केले चाकूचे वार !!

भाजी विकत घेत असताना अवघ्या १० रुपयांवरून झालेल्या वादात दादारमधील एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. सोनीलाल असे या भाजीविक्रेत्याचे नाव आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाबाहेर २४ जूनच्या मध्यरात्री ही घटना घडली. दादर स्टेशनबाहेर भाजी विक्रेता सोनीलाल आणि ग्राहक मोहम्मद हनीफ यांच्यात भाजी विकत घेण्यावरून वाद झाला. मामला होता फक्त १० रुपयांचा. मात्र, दोघांत वाद वाढल्यानंतर भाजी विक्रेता सोनीलालने ग्राहक मोहम्मद हनीफवर हल्लाच केला. भाजी विक्रेत्याने ग्राहकाच्या मानेवर आणि हातावर चाकूचे वार केले आणि हा हल्लेखोर भाजीविक्रेता पळून गेला.
बेशुद्धावस्थेत असलेल्या जखमी ग्राहकाला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भाजी विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.