Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अखेर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा ११ धावांनी निसटता विजय

Spread the love

अखेर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ११ धावांनी निसटता विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने दडपणाखाली चांगली कामगिरी करत विजयाचा चौकार लगावला. भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ २२४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. मोहम्मद नबीने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. पण त्याची झुंज अयशस्वी ठरली. आणि भारताचा सहावा विजय झाला.

भारताच्या २२५ धावांच्या साधारण  आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डावखुरा फलंदाज हजरतुल्लाह त्रिफळाचीत झाला. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने त्याला बाद केले. हजरतुल्लाहने २४ चेंडूत १० धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पांड्याने टाकलेल्या बाउन्सर चेंडूवर गुलबदिन झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूत २ चौकारांसह २७ धावा केल्या. ४२ धावांची आश्वासक भागीदारी करणारे अफगाणिस्तानचे दोनही फलंदाज बुमराहच्या निर्धाव षटकात बाद झाले. चौथ्या चेंडूवर रहमत शाह ३६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर हाशमतुल्लाह शाहिदी बुमराहकडेच झेल देऊन २१ धावांवर माघारी गेला. छोटया भागीदारीनंतर असगर अफगाण माघारी परतला. युजवेंद्र चहलने त्याचा अडसर दूर केला.

नजीबुल्लाह झादरानने नबीबरोबर चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न केला खरा पण शांत आणि संयमी फलंदाजी करणारा नजीबुल्लाह हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या. रशीद खानदेखील १४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद शमीने हॅटट्रिक घेत अफगाणिस्तानचा डाव गुंडाळला. शमीने ४ तर बुमराह, चहल आणि पांड्याने २-२ गडी टिपले.

प्रारंभी , भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या. या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

खरे तर चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी अत्यंत संथ खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने ३ चौकारांसह ५२ चेंडूत २८ धावा केल्या. केदार जाधवने संयमी अर्धशतक केले. पण तो देखील ६८ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला. अफगाणिस्तानकडून नबी, नैब यांनी २-२ तर मुजीब, आलम, रहमत शाह आणि रशीद खान यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!