Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मायावतींनी केले पक्षात फेरबदल , राज्यसभेत मिश्रा तर लोकसभेत दानिश अली असतील नेते, आनंदकुमार राष्ट्रीय उपाध्यक्ष

Spread the love

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. मायावती यांनी भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे. बसपात आता राष्ट्रीय स्तरावर दोन समन्वयक बनवण्यात आले आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्य़ा गौतम यांच्याकडेही राष्ट्रीय समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मायावती यांनी देशभरातील पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपली बॅग, मोबाइल फोन, पेन, कारच्या चाव्या बैठकीच्या खोलीबाहेर ठेवाव्या लागल्या. लोकसभा निवडणुकीत बसपाला १० जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. उत्तर प्रदेशातील १२ विधानसभेच्या पोटनिवडणुका बसपा स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा मायावती यांनी नुकतीच केली होती. या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची यावरही बैठकीत चर्चा झाली असून अंतिम यादी लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावती यांनी आजच्या बैठकीत भावाला राष्ट्रीय उपाध्यक्ष तर पुतण्याला राष्ट्रीय समन्वयकाची मोठी जबाबदारी दिली. मायावती यांनी आज पक्षात फेरबदल केले. त्यानुसार, दानीश अली यांना लोकसभेतील बसपाचे नेते बनवण्यात आले. जौनपूरमधील खासदार श्याम सिंह यादव यांना लोकसभेतील पक्षाच्या उपनेतेपदी बसवण्यात आले आहे. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश चंद्र मिश्रा हे राज्यसभेतील बसपाचे नेते राहणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!