Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन , पहिल्याच पावसात वीज कोसळून ४ ठार , अनेक ठिकाणी मुसळधार

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा पावसाकडे होत्या. अखेर कोकणपाठोपाठ महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. शनिवारी दुपारनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा श्वास घेतला आहे. पुण्यात संध्याकाळी सहाच्या सुमारात सिंहगड रोड परिसरात मान्सूनच्या जोरदार सरी कोसळल्या. पुणे वेधशाळेनंही हा मान्सूनचाच पाऊस असल्याचं म्हटलं आहे. पावसामुळे शेतकरी शेतमजूर यांच्यात समाधान व्यक्त केलं जात आहे. या पावसाच्या हजेरीने शेतकरी पेरणीसाठी नियोजन करून बी बियाणे खरेदीच्या तयारीला लागले आहे. आणखी जोरदार पाऊस बरसल्यानंतर परिसरात पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरातल्या पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उद्या म्हणजेच रविवारीही दिवसभर मान्सून पुण्याच मुक्काम ठोकेल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. दरम्यान, मान्सूनच्या पहिल्या सरी कोसळल्याने पुणेकर चांगलेच सुखावले आहेत. हवेतही छान गारवा निर्माण झाला आहे.
उशीरा का होईना विदर्भातही मान्सून दाखल झाला आहे. रविवारी २३ जूनला विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान खात्याने मुसळधार पाऊस पुढील 48 तासात विदर्भात सर्वदुर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक एम.एन.साहु यांनी माहिती दिली आहे.
याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकण, मराठवाड्यात आज चांगला पाऊस झाला़. हा पाऊस अजून दोन दिवस मिळणार आहे़. २४ जूनपर्यंत संपूर्ण राज्य मॉन्सून व्यापण्याची शक्यता असून विदर्भातही २४ पासून पावसाला सुरुवात होईल़. २५ जूननंतर पाऊस कमी होण्याची शक्यता असून २६ जूनला कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़ त्यानंतर काही दिवस ब्रेक येण्याची शक्यता आहे़. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे़.
मॉन्सून शनिवारी रत्नागिरी, सोलापूर, अदिलाबाद, ब्रम्हपूरी, पेद्रा, वाराणसी, गोरखपूर या ठिकाणापर्यंत आला आहे़. येत्या २ ते ३ दिवसात कोकणातील उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेशात पोहचण्याच्या दृष्टीने अनुकुल वातावरण आहे़.
कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचं धुमधडाक्यात आगमन झालं आहे. अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी त्यामुळे आनंदीत झाले आहेत. तर उकाड्यापासून हैरान झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहर आणि परिसरात मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाही.
अकोल्यातही सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामध्ये झाडाखाली उभे असलेल्या लोकांवर वीज पडल्याने एका युवकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मान्सूनच्या अंदाजानुसार राज्यभर पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरासह अकोल्यातही आज जोरदार पाऊस पडला. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडत असल्याने, बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथील 22 वर्षीय युवकाने इतर लोकांबरोबर पावसापासून बचावासाठी पातूर ते शिर्ला मार्गावर झाडाचा आसरा घेतला. मात्र, दुर्दैवाने त्या ठिकाणी वीज पडली आणि अभिजित श्रीकृष्ण इंगळे हा युवक इतर लोकांसह गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अभिजित सोबत झाडाखाली इतर उभे असलेले तिघे गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वर्धात वीज पडून आईचा मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. देवळी तालुक्यातील एकपाळा वाटखेडा शिवारातील घटना, पेरणी सुरू असताना अचानक विजांसह पाऊस आला. यावेळी वीज पडून ही घटना घडली आहे. सुमती कारोटकर असं मृत आईचं नाव आहे. जखमी मुलाचं नाव निलेश करोटकर असं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि विजांचामुळे एकाचा बळी गेला आहे. नागभीड तालुक्यातील बाळापूर येथे १२वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. चंदन प्रभाकर मैद असं मृत मुलाचं नाव आहे. शहर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर अन्यत्र पावसाची रिपरिप सुरू आहे.
जोरदार पावसाची वाट पाहत असलेल्या वर्धेकरांना आज पावसाने थोडा दिलासा दिला आहे. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारी काही वेळ अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे नागरिकांची धावपळ झाली तर काही जणांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. पावसामुळं उकाड्यात मात्र वाढ झाल्याचं जाणवतं. जोरदार पाऊस न बरसल्यास गरमी सहन करावी लागण्याची शक्यता आहे. तर शेतकरी पेरणीच्या कामासाठी लगबग करताना दिसत आहे. वाशिमसह मंगरुळपिर, शेलुबाजार आणि जऊळका रेल्वे भागात मान्सूनचं दमदार आगमन झालं. अनेक दिवसांपासून उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
औरंगाबाद शहरातही सायंकाळी जोरदार पावसाळा प्रारंभ झाला . जालना जिल्यातील रामनगर, विरेगाव, सेवली, नेर, मंठा, वातूर, परतुरसह अनेक भागांत चार वाजेच्या सुमारास पावसाचं आगमन झालं. प्रत्यक्ष जालना शहरात पाऊस झाला नसला तरी आकाशात दिवसभर ढगांनी गर्दी केली आहे. आभाळी वातावरणामुळे जाळणेकरणा प्रचंड उकाड्यापासून थोडी फार का होईना सुटका मिळाली. ग्रामीण भागात झालेल्या पावसाने बळीराजांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतीच्या कामांना आता वेग येईल.