Facebook live पडले महागात.. ओव्हरटेकच्या नादात अपघात, सख्ख्या भावांचा मृत्यू

कार चालवताना facebook live व tik tok व्हिडिओ बनवणे दोन सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले आहे. संकेत पाटील (वय-28) व पुंकेश पाटील (वय-23) अशी मृतांची नावे आहेत. भरधाव वेगात असलेली कार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नागपुरात हातला शिवाराजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल आणि नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. न्यूज १८ लोकमत ने हे वृत्त दिले आहे .
मिळालेली माहिती अशी की, संकेत व पुनकेश हे दोघे मित्रांसोबत कारने फिरायला गेले होते. भरधाव कारमध्ये संकेत व पुनकेशसह त्यांचे मित्र गाण्यांच्या तालावर थिरकत होते. समोरच्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार रस्त्यावरून उजव्या बाजूला रोडच्या उलटली. या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना दोघांचाही मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे अपघात होण्यापूर्वी मित्र कारमधून फेसबुक लाईव्ह करत होते. त्यामुळे अपघाताचा थरार फेसबुकवर लाईव्ह कैद झाला आहे.
संकेत व पुंकेश हे भाऊ नागपूरच्या कैलासनगरात राहत होते. काटोल तालुक्यात खासगी कामानिमित्त ते मित्रांसह झायलो गाडीने जात होते. गाडीमध्ये एकूण नऊ जण बसलेले होते. एका गाड्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची झायलो कार अनियंत्रित झाली आणि गाडी उलटून झाडावर आदळल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अपघात होईपर्यंत या घटनेचे फेसबुक लाईव्ह सुरुच होते. सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.