Mumbai : मुंबईच पुन्हा जगात भारी , पण का ते तुम्ही पहा …

मुंबईतील वाहतूक हा आता सार्वजनिक आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. एकेकाळी शिस्तबद्ध सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई शहरात सध्याची सर्वत्र पसरत चाललेली वाहतूक कोंडी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केला आहे. कारण जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणून मुंबईची ओळख झाली आहे. त्यामुळे नको असलेला विक्रम मुंबईच्या नावे झाला आहे.
‘टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८’च्या सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला आहे. जगभरातील ५६ देशांतील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या ४०३ शहरांचा सर्व्हेमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. जगभरातील ४०३ शहरांमधील वाहतुकीचा वेग आणि वाहतूक कोंडीसंदर्भातील पाहणी करुन निरिक्षणे नोंदवली आहेत.
सर्व्हेतील निरिक्षणानुसार वाहतूककोंडीमध्ये मुंबई अव्वल स्थानावर आहे. तर त्यानंतर अनुक्रमे बोगोटा, लीमा, नवी दिल्ली आणि मॉस्को या शहरांचा नंबर लागतो. मुंबईकरांना कोणतेही अंतर पार करण्यासाठी एकूण वेळेपेक्षा ६५ टक्के अधिक वेळ लागतो. तर दिल्लीत ५८ टक्के अधिक वेळ लागतो. मुंबईत एकेकाळी ८० टक्के असलेला हा सार्वजनिक वाहतुकीचा वाटा आजमितीला ६० ते ६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. खासगी गाडय़ा, दुचाकी वाहने, ऑटो, टॅक्सी यांचा २० टक्क्यांवरून आता ३५ ते ४० टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे