मोदींचा शपथ विधी : राहुल , सोनिया जाणार , ममतांचे मन बदलले

उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षांच्या नेत्यांपैकी कोण उपस्थित राहणार आणि कोण राहणार नाही याची चर्चा असताना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे . त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझादही राष्ट्रपती भवनात रंगणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आधी जाण्याचा आणि मग न जाण्याचा निर्णय घेतलेला असताना काँग्रेस काय भूमिका घेते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. मात्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी या सोहळ्याला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या शपथविधी सोहळ्याला पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामींसह मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही या शपथविधी सोहळ्याला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येईल एवढ्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत. काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीपुढे ठेवला होता. त्यांचा हा प्रस्ताव कार्यकारिणीने अमान्य केला असला तरी काँग्रेसमधील नेतृत्वाचं संकट काही टळलेलं नाही हे विशेष .