जालना : दगडाच्या खदानीत जुन्या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन दोन मुले जागीच ठार

अंबड तालुक्यातील वलखेडा शिवारात गट नंबर २२ मधील काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खदानीत जुन्या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन मजुराची दोन मुले जागीच ठार झाली. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. शुभम रवींद्र धोत्रे (वय ८) व शिवराज रवींद्र धोत्रे (वय ६), अशी मृत मुलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काकासाहेब आत्माराम कटारे (रा. अंबड) यांचा वलखेडा शिवारात स्ट्रोन केशरचा व्यवसाय (खडी मशीन) आहे. तेथे त्यांच्याकडे रवींद्र धोत्रे (रा. संगमजळगाव ता. गेवराई जि. बीड) हे पत्नीसह दोन महिन्यांपासून काम करत आहेत. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास धोत्रे पती-पत्नी हे खदानीत दगड फोडत असताना त्याचे दोन मुले शुभम व शिवराज हे कडक उन्हात खदानीला खेटून असलेल्या सावलीत बसलेले होते.
यावेळी अचानक जुन्या ब्लास्टिंगच्या तोट्याचा स्फोट झाला आणि ही दोन बालके दहा फुटाचे अंतरावर उडून पडून जगीच मरण पावले. ही घटना घडली तेव्हा धोत्रे पती-पत्नी हे त्याच खदानीत ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजुला दगड भरत असल्याने ते बचावले. हा स्फोट इतका भयंकर होता की दोन्ही बालकांचे चेहरे ओळखू सुद्धा येत नव्हते. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बलैय्या, जमादार विष्णु चव्हाण, अनिल घेवंदे, एस. बी. गोतीस, महेंद्र गायके, महेश खैरकर, दुर्गेश गोफणे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन्ही बालकांचे प्रेत शवविच्छेदनाकिता उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात चंद्रकांत लाड यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.