Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण, 7 लोकसभा मतदार संघात मतदान

Spread the love

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदार संघात 14 उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक- 16,नागपूर – 30, भंडारा- गोंदिया – 14, गडचिरोली- चिमूर – 5, चंद्रपूर – 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त व अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.

राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 30 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांची दारु, 4.61 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 44 कोटी  रुपयांचे  सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहीर यांचा  समावेश आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सी-व्हिजिल ॲपचा राज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत 2हजार 527 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 1 हजार 497 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप,पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!