Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Lok Sabha 2019 : भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद वाराणसीमध्ये मोदींच्या विरुद्ध लढाईच्या पवित्र्यात !!

Spread the love

प्रियांका  गांधी यांनी मोदींविरुद्ध लढू का ? असे कार्यकर्त्यांना विचारलेले असतानाच  भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. महाआघाडी मोदींविरोधात आव्हान उभं करू शकत नाही म्हणून मी उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं आझाद यांनी म्हटलं आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

भीम आर्मीने शनिवारी वाराणसीतून एक मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत आझाद हे स्वत: सहभागी होणार असल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन यांनी सांगितले आहे. ‘मी शनिवारी वाराणसी दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी मागितली आहे. मी या मतदारसंघातून निवडणूक लढत असून माझ्या प्रचाराची सुरुवात म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. आम्ही एका धार्मिक स्थळावरून सुरुवात करणार होतो. त्यासाठी आम्ही वाराणसीतील रविदास मंदिराची निवड केली आहे. आम्ही दुचाकीवर रविदास गेटपर्यंत म्हणजे सुमारे 7 किमी जाणार आहोत’ असं चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे.

मी एक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहणार आहे. देशाला दुबळा करणारा व्यक्ती उत्तर प्रदेशमधून जिंकावा असे मला वाटत नाही. मी पूर्वीच स्पष्ट केले आहे की, मायावती, अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव हे जर या मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छित नसतील तर मी वाराणसीतून उभा राहीन. मोदींविरोधात एक सशक्त उमेदवार उभा राहणे आवश्यक होते. पण तसे दिसत नव्हते. मी मोदींना सहज जिंकू देणार नाही’ असंही आझाद यांनी म्हटलं आहे.

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. मोदींना पराभूत करून त्यांची गुजरातला रवानगी करणार असल्याचे आझाद यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध आपण वाराणसीतून संघटनेतील मजबूत व्यक्ती उभा करणार आहोत. परंतु योग्य उमेदवार न मिळाल्यास खुद्द मोदी यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले होते.

2 thoughts on “Lok Sabha 2019 : भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद वाराणसीमध्ये मोदींच्या विरुद्ध लढाईच्या पवित्र्यात !!

  1. लढाईच्या पवित्र्यात ??
    स्वस्तात प्रसिद्धी स्टंट पेक्षा यामध्ये विशेष काही आहे, अस वाटत नाही.

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!