आयआरएस अधिकारी प्रीता हरित राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये

मेरठ येथे कार्यरत असलेल्या आयआरएस अधिकारी प्रीता हरित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रीता हरित या आयकर विभागात विशेष आयुक्तपदी कार्यरत होत्या. बुधवारी उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रमुख राज बब्बर यांच्या उपस्थितीत प्रीता हरित यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले.
प्रीता यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मुळच्या हरयाणाच्या असलेल्या प्रीता पूर्वीपासूनच दलितांच्या अधिकारांसाठी सक्रिय आहेत. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दलितांना अधिकार मिळावा यासाठी अभियान सुरू करणाऱ्या प्रीता हरित नेहमी चर्चेत राहिलेल्या आहेत. १९८७ च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी असलेल्या प्रीता हरित यांनी दनकौर येथे दलित महिलांवरील अत्याचारावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली होती. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती.