CSMT Bridge Collapse : पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एलफिन्स्टन रोड दुर्घटना आणि अंधेरी ब्रिज दुर्घटना झाल्यानंतर गोयल यांनी पुलांचं ऑडिट केल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा फोल ठरला असून त्यांनी आता आजच्या दुर्घटनेची जबाबदारी घेऊन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सुरजेवाला यांनी एकूण दोन ट्विट केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी या दुर्घटनेत झालेल्या प्राणहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
सीएसएमटी पूल दुर्घटनेवरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणी केली आहे. हा पूल मुंबई पालिकेच्या अखत्यारितील असून सहा महिन्यांपूर्वीच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते, अशी माहिती मला मिळाली आहे. संबंधित ऑडिटरने हे पूल धोकादायक नसल्याचा अहवाल दिला होता. पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचेही त्याने नमूद केले होते. असे असूनही हा पूल कोसळत असेल तर ही गंभीर बाब असून संबंधित ऑडिटर तसेच या ऑडिटरची नियुक्ती करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कलम ३०२ अन्वये (खुनाचा गुन्हा) कारवाई व्हायला हवी, अशी मागणी देवरा यांनी केली. देवरा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एल्फिन्स्टन, अंधेरी येथील पूल दुर्घटनांचा उल्लेख करत सरकार मुंबईकरांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याची टीकाही देवरा यांनी यावेळी केली.