Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काय म्हणाले भारताच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख …

Spread the love

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून २७ फेब्रुवारी रोजी भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले होते. यासाठी त्यांनी एफ-१६ या विमानांचा वापर केला. पाकिस्तानकडून याचा यापूर्वी इन्कार करण्यात आला होता. मात्र, त्यांचा हा दावा खोटा असल्याचे यावेळी तिनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर याचे थेट अवशेषच यावेळी सर्वांसमोर दाखवण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा उघड झाला आहे.

आमची लढाई दहशतवादाविरुद्ध असून जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत राहणार तोपर्यंत दहशतवादी तळांवरील हल्ले भारत सुरूच ठेवणार, अशा शब्दांत भारताच्या तिन्ही दलांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत पाकला ठणकावले. पाकिस्तानला काय हवं आहे, हे आता पाकिस्ताननेच ठरवायचे आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

भारताच्या तिनही सैन्यदलांच्यावतीने (लष्कर, हवाई दल आणि नौदल) गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये लष्कराच्यावतीने मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल, हवाई दलाच्यावतीने एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर आणि नौदलाच्यावतीने रिअर अॅडमिरल डीएस गुजराल यांनी पत्रकांरांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला.

एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर म्हणाले, २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले. भारतीय हवाई दलाने आपल्या हद्दीतल्या जांगड भागात पाकिस्तानची अनेक विमाने पाहिली. त्यांच्या या विमानांना भारताच्या सुखोई, मिराज आणि मिग विमानांनी पळवून लावले. पाकिस्तानच्या या विमानांनी आपल्या लष्करी तळांना टार्गेट केले होते. मात्र, ते आपले नुकसान करु शकले नाहीत. मात्र, या कारवाईत भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले. मात्र, पाकिस्तानने एफ-१६ वापरले नाही आणि भारताने ते पाडल नाही असा पहिला खोटा दावा पाकने केला होता. मात्र, भारताने पाडलेल्या या विमानाचे अवशेष पूर्व राजौरीत भागातील भारताच्या हद्दीत सापडले आहेत. या विमानांवर एक इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असतं ते ही यामध्ये आढळून आलं आहे.

दरम्यान, या कारवाईच्यावेळी भारताच्या दोन विमानांना आग लागली त्यानंतर एक मिग विमान कोसळलं त्यातील पायलट चुकून पीओकेत गेल्याने त्याला भारतात येणे शक्य झाले नाही. मात्र, पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची दोन विमाने पाडल्याचा आणि तीन पायलट पकडल्याचा दुसरा खोटा दावा केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनीच पुन्हा आपला दावा बदलत एकच भारतीय पायलट त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले.

मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल म्हणाले, बालाकोटच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारताच्या नौशेरा, भिमबरी आणि कृष्णाघाटीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने त्यांना सडेतोड उत्तर दिले. यावेळी लष्कराचे ब्रिगेड मुख्यालय, बटालियन मुख्यालय, लॉजिस्टीक भागांना टार्गेट केले होते. गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानकडून ३५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. लष्कर शांततेसाठी कटिबद्ध आहे. मात्र, जोपर्यंत पाकिस्तान अशी पावले उचलेल त्याला आम्ही प्रत्युत्तर देणारच यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे त्यांनी यावेळी देशाला अश्वस्त केले.रिअर अॅडमिरल डीएस गुजराल म्हणाले, भारतीय नौदलही कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की गरज पडली तर नौदल शत्रूच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल. तत्पूर्वी तिन्ही दलांकडून मी तुम्हाला शांतता आणि सुरक्षेचा विश्वास देतो.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतीही वाढल्या आहेत. गेल्या २ दिवसांत पाकिस्तानी सैन्याने ३५ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, असे मेजर जनरल महल यांनी नमूद केले. बालाकोट येथील भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला अनेक भागांत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय लष्कराचं ब्रिगेड मुख्यालय, बटालियन मुख्यालय आणि अन्य ठिकाण्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आपल्या लष्कराने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीनंतर तिन्ही दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या तीन दिवसांपासून भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या सर्वच घडामोडींची तपशीलवार माहिती दिली. तिन्ही दलांनी निवेदन केल्यानंतर संपूर्ण कारवाईबाबत प्रथमच पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे देण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!