Pakistan : भारतीय विंग कमांडरला पकडल्याचा पाकिस्तानचा दावा
भारताची दोन विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया आणि लष्कराकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायू सेनेच्या कोसळलेल्या विमानांचे फोटो आणि एक व्हिडीओही पाकिस्ताननं व्हायरल केले आहेत. तसेच पाकिस्ताननं एका वैमानिकाला अटक केल्याचाही कांगावा केला असून, त्यासंदर्भातील एक व्हिडीओही व्हायरल केला. परंतु तो व्हिडीओ खरा आहे की खोटा हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या मीडिया आणि सरकारकडून या खोट्या बातम्या पसरविण्यात आल्याने तेथील सोशल मीडियावरही हा व्हिडीओ अन् फोटो व्हायरल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारताचे विमान पाडल्याचा दावा केला जात असला तरी भारतीय सैन्याकडून या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पाकिस्ताननं एका विंग कमांडरला अटक केल्याचा दावा केला असून, त्याचं नाव अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगितलं जातंय.
पाकिस्ताननं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्येही एक व्यक्ती अभिनंदन असल्याचं सांगत आहे. तसेच तो व्यक्ती वायुसेनेचे विंग कमांडर असल्याचीही माहिती देत आहे. त्याचा सर्व्हिस नंबर 27981 असल्याचंही या व्हिडीओतून दिसत आहे. पाकिस्ताननं सांगितलं आहे की, अभिनंदन 16 डिसेंबर 2015मध्ये वायुसेनेत दाखल झाला होता. व्हिडीओमध्ये दिसत असलेला व्यक्ती जखमी असून, त्याला दोरीच्या सहाय्यानं बांधण्यात आलं आहे. परंतु या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळली जात आहे.