विविध ठिकाणी तीन अपघात : ९ ठार १७ जखमी

विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत ९ जणांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर पिंपळगावपासून पुढे दौलत हॉटेलजवळ दोन आयशर कँटरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर १४ जण जखमी झाले. जखमींना तातडीने पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी पावलेले सर्वजण टाकळी नाशिक येथील असून केदारई येथे सर्व जण कार्यक्रमास चालले होते. बीडमध्ये सोलापूर-धुळे मार्गावर कार आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अन्य एका अपघातात ४ जण मृत्युमुखी पडले असून तीन जण जखमी आहेत. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही आज सकाळी अपघात होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला.