Sharad Pwar : महाआघाडीची मुंडेच्या गडात महासभा : पवारांचे मनोगत त्यांच्याच शब्दात

मी अनेकवेळा बीड जिल्ह्यात आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळीत झालेली ही सभा माझ्या ५० वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील मोठ्या सभांपैकी एक आहे. त्याकरता धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन.
गेली चार वर्षे भलत्याच लोकांच्या हातात सत्ता होती. या देशाच्या कानाकोपऱ्यात गेले की लोक सांगतात की आम्ही समाधानी नाही. या सरकारने नोटाबंदी केली, रोजगार दिला नाही. आज लाखोंच्या संख्येने तरुण हेलपाटे घालत आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही. त्यांना कष्ट करण्याचे अधिकारही या सरकारने ठेवला नाही.
आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे, गुराढोरांना पाणी नाही, सोन्यासारखी पिकं जळून खाक होत आहे. शेतकरी संकटात आहे पण हे सरकार कुठेही चारा छावणी तयार करत नाही किंवा काही उपाययोजना करत नाही. या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याची धमक नाही.
सर्व समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात पडून आहे. राज्याचे महाधिवक्ता म्हणून ज्या व्यक्तींने काम पाहिले आहे तीच व्यक्ती आज मराठा आरक्षणविरोधात कोर्टात उभी आहे.
सरकारने सांगितले धनगर समाजाला आरक्षण देतो. मात्र अजून आरक्षण दिले नाही. मुस्लिम समाजाला आज आरक्षण दिले जात नाही. कोर्टाने त्यांना सांगितले की आरक्षण मुस्लिम समाजाचा अधिकार आहे. पण आरक्षण दिले जात नाही याचे एकच कारण आहे, ते म्हणजे या सरकारला धर्माच्या नावावर विद्वेष वाढवायचा आहे.
मी आयसीसीचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जगाचे क्रिकेट मी अनुभवले आहे. मात्र त्या क्रिकेट खेळामध्येही वाद घातला जात आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर अशा महान खेळाडूंचा अपमान केला जात आहे. सचिन तेंडुलकर यांनी एक भूमिका मांडली की भारताच्या खेळाडूंना पाकिस्तानशी सामना करू द्या. त्यांचा पराभव करण्याची धमक आमच्या खेळाडूंमध्ये आहे मात्र त्यांच्यावर जातीयवाद आणि पाकिस्तान प्रेमाचा ठपका ठेवला गेला. ज्यांनी सचिनवर आरोप केला त्यांना माहिती नाही, वयाच्या १५ व्या वर्षी सचिनने पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानचा पराभव केला होता. पराभव करण्याची धमक ज्या सचिनमध्ये आहे त्यावर आरोप केले गेले याची खंत वाटते. याचे एकच कारण आहे. यांना विष पसरवायचे आहे. यांना उत्तर देण्याची आणि धडा शिकवण्याची वेळ आली आहे.