किन्नर दिशा पिंकी शेख वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ता

सोशल मीडियावरील सक्रिय किन्नर सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांची वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड होणारी दिशा ही महाराष्ट्रातील पहिली किन्नर आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पक्षाच्या प्रवक्त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली.
‘आयुष्यात पहिल्यांदा अधिकृत राजकीय जवाबदारी स्वीकारताना थोडं दडपण आलंय पण आणि स्वतःबद्दल थोडा स्वाभिमानही वाटतोय. समाजात बदल घडवून आणायचा असेल तर अल्पसंख्यांकांना सत्तेत वाटा देणं गरजेचं आहे. लैंगिक अल्पसंख्यकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना राजकीय प्रतिनिधित्व देणं महत्त्वाचं आहे. मला मिळालेल्या या संधीमुळे आमच्या समाजातील अनेक प्रश्नांना मी वाचा फोडू शकते. अधिकृतरित्या राजकीय जबाबदारी स्वीकारण्याच्या या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी मला एक वर्ष लागलं. शिवाय माझ्या समुदायातील मंडळी माझा हा निर्णय स्वीकारतील का याबद्दल मी साशंक होते. परंतु, त्यांनी माझ्या या निर्णयाचे स्वागतच केले. राजकीय बदलांचे वारे आता खऱ्या अर्थानं वाहू लागले आहेत असा विश्वास आता त्यांनाही हळूहळू बसू लागला आहे.’
आज वंचित बहुजन आघाडीच्या शिवाजी पार्कवरील सभेत दिशा पिंकी यांच्या भाषणाला उपस्थितांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला .