उद्यापासून बारावीची परीक्षा : ऑल दि बेस्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा उद्यापासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. राज्यभरातील १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून २ हजार ९५७ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी आणि परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण करण्याच्या सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने २५२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाईल बंदी असून, शिक्षकांनी मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी पहिल्यांदाच सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या संख्या ६ हजारांनी वाढली आहे. तर १३५ परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. दरम्यान निश्का नरेश हसनगडी या विद्यार्थिनीला विशेष बाब म्हणून आयपॅडवर परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. अध्ययन अक्षमतेमुळे तिच्या डॉक्टरांकडून ही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ती मुंबईतील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
रिंकू राजगुरू देणार बारावीची परीक्षा; पोलीस बंदोबस्ताची मागणी
उद्यापासून सुरू होत असलेली हि परीक्षा ‘सैराट’ फेम आर्ची उर्फ रिंकू अर्थात, प्रेरणा महादेव राजगुरू ही देखील देणार आहे. तिच्या परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संबंधित महाविद्यालयानं केली आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा देणार आहे. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होण्याची व त्यामुळं परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी टेंभूर्णी पोलीस ठाण्याकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसं पत्रच त्यांनी पोलीस ठाण्याला लिहिलं आहे. बहिःस्थ विद्यार्थी म्हणून रिंकू बारावीची परीक्षा देत आहे. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांचे पेपर ती देणार असल्याचे सांगण्यात आले. तिनं यापूर्वी दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती. या परीक्षेत ती चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली होती.