निलेश म्हणाला ते काय खरे नाही , आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिकच : नारायण राणे

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी आनंद दिघे यांचा मृत्यू हा अपघात नसून हत्या होती असा खळबळजनक दावा नीलेश राणे यांनी केला होता. मात्र हा दावा खोडून काढत आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिक होता असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. दिघे यांचा मृत्यू कोणीही मारून झालेला नाही, त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता. मी त्यांना भेटणारा शेवटचा माणूस होतो त्यांच्या अपघातानंतर मी जेव्हा त्यांना भेटलो त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या मृत्यूची बातमी आली.
मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांची परिस्थिती खूपच नाजूक होती. डॉक्टर दिघे यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मी बाहेर आलो बाळासाहेबांना फोन केला आणि त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली. नीतू मांडके यांना जर रूग्णालयात पाठवा अशी विनंतही मी बाळासाहेबांना केली. नीतू मांडके आले तर काहीतरी करू शकतील असं मला वाटत होतं म्हणून मी विनंती केली होती. त्यानंतर बाळासाहेब नीतू मांडके यांच्याशी बोलले. नीतू मांडके यांचा मलाही फोन आला, मात्र नीतू मांडके हे ठाण्याकडे येण्याआधीच दिघे यांचा मृत्यू झाला होता असंही राणे यांनी म्हटलं आहे. जे काही आरोप होत आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही. यानंतर या विषयावर आता कायमचा पडदा पडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे तसंच मुलगा नीलेश राणेलाही मी वास्तव काय आहे याची कल्पना देईन असंही राणे यांनी स्पष्ट केलं आहे. सामला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.