प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम

महाआघाडीची दारोमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर…
महाराष्ट्राचे राजकारण
सद्यस्थितीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, तसेच राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून बैठकांवर बैठका घेण्यात येत असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा काँग्रेसचा अजेंडा काय ? असा प्रश्न विचारून त्यांनी ते 12 जागांवर ठाम आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे आघाडी होईल कि नाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आजच्या जळगावच्या सभेतही प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करीत आघाडीच्या चर्चेला एका अर्थाने धुडकावूनच लावले .
आज जळगावात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , आम्ही जाहीर केलेल्या जागा सोडूनच आता चर्चा होईल. शिवाय आम्ही संघाच्या बाबतीत काँग्रेसला जो अजेंडा मागितला होता त्याचेही उत्तर आम्हाला मिळाले नसल्याने त्यांच्याशी युतीचा प्रश्नच उध्दभवत नाही असे सांगितल्याने आघाडी समोरील अडचणी वाढल्या आहेत .तर भिडे गुरुजींच्या विषयावरून त्यांनी आधीच राष्ट्रवादीला टार्गेट केलेले आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान परतवून लावण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून निवडणुकीत भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच मनसेसोबत आघाडीच्या नेत्यांची चर्चाही सुरू आहे. मित्रपक्षांसाठी मिळून एकूण आठ जागा सोडण्याची तयारी आघाडीने केली आहे. मात्र नवे मित्र पक्ष सोबत न आल्यास ऐनवेळी कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्लान बी तयार ठेवला आहे. मित्रपक्ष सोबत न आल्यास ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्लान बी तयार ठेवला आहे. त्यानुसार अन्य कुठल्याही पक्षासोबत आघाडी न झाल्यास काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
सेनेची ग्यानबाची मेख आणि भाजप
दरम्यान दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सेने -भाजप युतीबाबत चर्चा केली . लोकसभा आणि विधानसभेचे जागावाटप या विषयावर बोलण्याआधीच सेनेच्या वतीने राज्यात आम्ही आणि केंद्रात तुम्ही हे मेनी असेल तरच चर्चा करा असा निर्वाणीचा इशारा भाजपाला दिल्याने भाजपची तारांबळ होण्याची शक्यता आहे . वास्तविक ज्यांच्या जागा अधिक त्यांचा राज्यात मुख्यमंत्री या फॉर्मुल्यामुळे गेल्यावेळी मुख्यमंत्रीपदाची संधी भाजपने मिळवली होती परंतु या फॉर्मुल्याला यावेळी सेनेचा तीव्र विरोध आहे . त्यामुळे या युतीला भाजपचे केंद्रीय नेतृत्व मान्यता देईल किंवा नाही हे सांगणे अवघड झाले आहे . तरीही या दोन्हीही नेत्यांनी आज चर्चा करून प्राथमिक चर्चेला विराम दिला.