औरंगाबादच्या दोघांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हे राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानले जातात. या पुरस्कारांची आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केली. यात औरंगाबादचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणाऱ्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. अमेय शामसुंदर जोशी आणि सागर श्रीनिवास कुलकर्णी या औरंगाबादच्या दोन प्रशिक्षकांना जिम्नॅस्टिक्स या खेळात थेट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. १ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि ब्लेझर असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी या दोन प्रशिक्षकांची उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०१७-१८) यासाठी निवड झाली आहे. अमेय जोशी औरंगाबादला एका खाजगी कंपनीत उपव्यवस्थापक या पदावर काम करतात. तर सागर कुलकर्णी हे मराठवाडा शारिरीक शिक्षण महाविद्यालयात सहयोगी क्रीडा प्राध्यापक म्हणून काम करतात. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक मकरंद जोशी यांना दिले आहे.
अमेय जोशी यांनी १९९०साली खेळाडू म्हणून या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांना १९९२ ला प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार आणि २००३ साली राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रा.सुधीर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला. त्यानंतर २००४ ते २००८ या काळात बल्गेरिया, थायलंड, चीन, जपान या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत अमेय जोशी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खेळाडू म्हणून शिवछत्रपती पुरस्कार जोशींना २००६-०७ साली मिळाला होता. त्यानंतर २००८ पासून जोशी यांनी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१२ साली इंडोनेशिया येथे झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी प्रतिनिधीत्व केले.२०१४ ते २०१६ या काळात अमेय जोशी यांचे विद्यार्थी वंदिता जोशी, मयूर बोऱ्हाडे, इशा महाजन यांनी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पटकावले आहेत. सध्या जोशी यांच्याकडे राज्य पातळीवर ४५ तर राष्ट्रीय पातळीवर ६० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
प्रा. सागर कुलकर्णी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यार्थी म्हणून क्रीडा क्षेत्रात १९८६ साली सुरुवात केली. १९८८ साली साई केंद्रीय क्रीडा प्राधिकरणात शिक्षणासाठी त्यांना जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर २००२ साली त्यांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार अवघ्या ५ गुणांकनामुळे हुकला. पण प्रा. मकरंद जोशी यांनी सागर कुलकर्णी यांना प्रोत्साहन देत क्रीडा क्षेत्रात योगदान देण्यास सांगितले. त्यानंतर २००९ साली कुलकर्णी यांना मराठवाडा शारिरीक शिक्षण महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या जिम्नॅस्टिक शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे कुलकर्णी यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले.