तृतीयपंथीयाला त्याने सोडले नाही ….

२५ हजारांची लाच घेताना पोलीस एसीबीच्या जाळ्यात
गोवंडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुखापतीच्या गुन्ह्यामध्ये भावाला अटक न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तृतीयपंथीयाकडून २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज करण्यात आली. एका तृतीयपंथीयाकडून पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपी पोलिसांचं नाव दीपक हरिभाऊ खरात (४८) असं आहे. दीपक हा सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार यांच्या मामेभावावर दुखापतीचा गुन्हा गोवंडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास दिपक खरात हे करत होते. तक्ररारदार यांचा भाऊ सध्या जामीनावर असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी खरात याने तृतीयपंथीयाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी खरात याने २५ हजार रुपयांची लाच स्विकारण्याचं कबूल केले. आज गोवंडी पोलीस ठाण्यात पथकाने सापळा रचला. तृतीयपंथीयाकडून लाच स्विकारताना खरात याला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून खरात विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी एक घटना
तलाठी व लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक
कल्याण – तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच स्वीकारताना तलाठी शंकर साळवी (38) आणि लिपिक नितीन पाटील (35) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. तक्रारदार यांनी त्यांच्या रुंदे तालुका कल्याण येथील जमिनीचे फेरफारचे कागदपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर कागदपत्रे तक्रारदार यांना पुरविण्यासाठी साळवीने तीन हजाराची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी, तक्रारदारकडून साळवी याच्यावतीने तीन हजारांची लाच स्वीकारताना पाटील याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.