शबरीमला मंदिर देवस्थान समिती अचानक यू टर्न

शबरीमला मंदिर प्रवेशाच्या वादासंदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. मंदिराचं कामकाज पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्थान समितीने आज सुप्रीम कोर्टात अचानक यू टर्न घेतला आणि सांगितलं की सर्व वयोगटाच्या महिलांना भगवान अय्यप्पांच्या मंदिरात पूजेची परवानगी मिळायला हवी, तेव्हा या प्रकरणाच्या सुनावणीला वेगळं वळण मिळालं.
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. आर. एफ. नरीमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. इंदु मल्होत्रा यांचे खंडपीठ सबरीमला निर्णयावर पुनर्विचाराची मागणी करणाऱ्या ४८ फेरविचार याचिकांवर विचार करणार आहे. या सुनावणीदरम्यान बिंदु आणि कनकदुर्गा या मंदिरात प्रवेश केलेल्या दोन महिलांनीही आपली बाजू मांडली. मंदिर प्रवेशांनंतर आपल्याला धमक्या मिळत असून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश दिला जावा, अशा प्रकारच्या बंदीतून लैंगिक भेदभावच दिसतो, असे सांगत सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने २८ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक निर्णय देत या मंदिरात सर्व वयाच्या महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला होता.