Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajasthanPoliticalCrisisUpdate : काँग्रेसच्या राजस्थानातील “राज ” कि बात …, गहलोत यांच्यासमोरील अडचणीत वाढ …

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या स्पर्धेत सामील झालेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी पक्षाच्या हायकमांडने पाठवलेल्या केंद्रीय निरीक्षकांशी केलेल्या वर्तणुकीमुळे गेहलोत अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. ताज्या माहितीनुसार राजस्थानमधील ताज्या राजकीय घडामोडींनंतर अशोक गेहलोत पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात, असे वृत्त आहे. दिल्लीतील १० जनपथवर बैठक सुरू होण्यापूर्वीच हि मोठी माहिती समोर येत आहे. केरळपासून जयपूरपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजस्थानच्या मुद्द्यावरून हायकमांड घेतील त्या निर्णयावर ठाम राहणार आहेत.


सीडब्ल्यूसी सदस्य आणि पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार  मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल हे चार नेते अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. राजस्थानातून येणारे गेहलोत ज्या पद्धतीने वागले ते पक्ष नेतृत्वाला आवडले तर नाहीच पण त्यांच्या या वागण्यामुळे राजस्थानाच्या बाबतीत वरिष्ठ नेतृत्वाची अडचण वाढली आहे. राजस्थानमधील धक्कादायक घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

१० जनपथवर होते आहे विशेष बैठक…

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल १० जनपथवर पोहोचले आहेत. राजस्थानचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही बैठकीला हजेरी लावली आहे. राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामेश्वर दुडी हेही १० जनपथवर आले आहेत. राजस्थानत  नेहमीच   काँग्रेसला संकटातून यशस्वीपणे बाहेर  पाडणारे केसी वेणुगोपाल,  राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष रामेश्वर दुडी हेही १० जनपथवर पोहोचले आहेत. माजी खासदार कमलनाथ यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे. अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नेत्यांमध्ये कमलनाथ यांची गणना होते. अशा स्थितीत कमलनाथ यांना दिल्लीत बोलावून सोनिया गांधी राजस्थान काँग्रेसच्या संकटावर अशोक गेहलोत यांच्याशी बोलण्यास सांगू शकतात, तसेच राजस्थानचे संकट सोडवण्यासाठी कमलनाथ मध्यस्थी करू शकतात, असेही मानले जात आहे.


काँग्रेस नेते के मुरलीधरन म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचे चित्र ३० सप्टेंबरलाच स्पष्ट होईल. त्याच दिवशी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण-कोण लढतात हे कळेल. २९ सप्टेंबर रोजी दुपारी केरळमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होईल. तूर्त सर्व नेत्यांशी चर्चा सुरू असून अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. अध्यक्षपदाच्या  निवडणुकीत सोनिया मॅडम आणि राहुल जी यांनी आधीच जाहीर केले आहे की ते हस्तक्षेप करणार नाहीत. राजस्थानचे प्रकरण एक-दोन दिवसांत निकाली निघेल. त्याच वेळी, शशी थरूर यांनी आधीच घोषणा केली होती, परंतु तीन दिवसांत आणखी काही लोकही अर्ज दाखल करतील आणि ३० सप्टेंबरपर्यंत आम्हाला स्पष्ट चित्र दिसेल.

एक दिवस आधीच गेहलोत समर्थकांनी दिला होता सामूहिक राजीनामा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, पक्षाने अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राजस्थानमधील नवीन मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत सल्लामसलत करण्यासाठी जयपूरला पाठवले होते. पण, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच गेहलोत गटाने हायकमांडविरोधात बंड केले आणि ८२ आमदारांनी सामूहिक राजीनामे दिले. नंतर हे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले. हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधात उठाव असल्याचेही मानले जात आहे. या संदर्भात पक्षाने अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हात वर करून आमदार आमच्या “बस”मध्ये नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता स्वतः सोनिया गांधी राजस्थानच्या संकटावर सक्रिय झाल्या आहेत.


राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात आता नवी दिल्लीतही खळबळ उडाली आहे. अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधींना भेटून आपला अहवाल सादर केला. सोनिया गांधी यांची भेट घेऊन १० जनपथमधून बाहेर पडलेल्या अजय माकन यांनी भेटीतील मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या. सोनिया गांधी यांना राजस्थानच्या संपूर्ण  परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आल्याचे ते म्हणाले. अजय माकन म्हणाले की, राजस्थानमध्ये बोलावलेली विधिमंडळ पक्षाची बैठक अशोक गेहलोत यांच्या सांगण्यावरूनच बोलावण्यात आली होती.

आमदारांशी बोलून सोनिया गांधींना अहवाल द्यायचा होता, असे ते म्हणाले. त्यासाठी आमदारांनी अटी घातल्या, त्याला आम्ही विरोध केला. अजय माकन म्हणाले की, अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असून ते अध्यक्षपदी निवडून आले तर ते स्वत: निर्णय घेतील. ते म्हणाले की हा हितसंबंध नाही तर काय आहे. अजय माकन पुढे म्हणाले की, ठराव मंजूर झाला तर त्यावर अटी घालण्यात येत नाहीत. काँग्रेसमध्ये ही परंपरा नाही. आमदारांनी तीन अटी ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. अजय माकन यांच्या म्हणण्यानुसार, नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय १९ ऑक्टोबरनंतर घ्यावा, अशी अट आमदारांच्या वतीने ठेवण्यात आली होती. दुसरी अट अशी होती की, आमदारांशी गटातच बोलले पाहिजे. प्रत्येक आमदाराशी बोलू नये, असे खुद्द अशोक गेहलोत यांनी सांगितले.

अजय माकन म्हणाले की, तिसरी अट होती की राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या छावणीतील असावा. ते म्हणाले की, आम्ही संपूर्ण घटनेची माहिती सोनिया गांधींना दिली आहे. सोनिया गांधी यांनी सविस्तर अहवाल लिखित स्वरूपात देण्यास सांगितले आहे. आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत आम्ही लेखी अहवाल सोनिया गांधींना सुपूर्द करू.

१० जनपथवर होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्येही राजकीय खळबळ उडाली असून अशोक गेहलोत यांचे समर्थकही अधिक सक्रिय झाले आहेत. आमदार गोपाल मीना, रफिक खान, रोहित वोहरा, चेतन दुडे यांनीही शांती धारीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचून गेहलोत यांची भेट घेतली. दरम्यान आमदार स्वतःच आमच्याकडे येऊन राजीनामे स्वीकारण्यासाठी दबाव आणत असल्याचं शांती धालीवाल यांनी म्हटलं आहे.

गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून पक्षाच्या पुढील अध्यक्षपदाच्या शर्यतीत अशोक गेहलोत यांचा विचार केला जात होता. अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जातात आणि राहुल गांधी यांनी एक व्यक्ती एक पदाची उदयपूर घोषणा पुढील अध्यक्षांनाही लागू होईल, असे स्पष्ट केले होते. दरम्यान आज जे काही राजस्थानात घडले त्यावरून अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात असे वृत्त आहे.

खुद्द अशोक गेहलोत यांनी हायकमांडचा निर्णय सर्वांना मान्य असेल असे सांगितले होते. मात्र केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे जयपूरला पोहोचताच गेहलोत यांचे समर्थक सक्रिय झाले आणि भलतेच घडले.

शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी गेहलोत यांचे समर्थक म्हणविणारे  सुमारे ९० आमदार जमले आणि त्यांनी हायकमांडलाच आव्हान दिले. या आमदारांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या निषेधार्थ विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामाही जाहीर केला. केसी वेणुगोपाल यांनी अशोक गेहलोत यांना फोन करून याबाबत बोलले असता त्यांनी हात वर केले. सरतेशेवटी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना विधिमंडळ पक्षाची बैठक न घेताच दिल्लीला परतावे लागले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!