Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : सोनिया आणि राहूल गांधी यांना ईडीने दिलेल्या समन्सवरून काँग्रेस -भाजपमध्ये जुंपली …

Spread the love

नवी दिल्ली : चौकशी बंद झालेल्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना पुन्हा एकदा समन्स बजावल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना 2 जूनला म्हणजे उद्या, तर सोनियांना 8 जूनला बोलावण्यात आले आहे. हे प्रकरण 2015 मध्ये बंद झालेल्या जुन्या खटल्याशी संबंधित आहे आणि ते पुन्हा उघडण्यात आले आहे.


दरम्यान, सोनिया आणि राहुल यांना समन्स बजावल्याच्या प्रकरणावर काँग्रेस पक्षाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. मनी लाँड्रिंगचा कोणताही पुरावा नाही की पैशाच्या देवाणघेवाणीचा कोणताही पुरावा नाही. नॅशनल हेराल्ड प्रकरणात, फक्त इक्विटीमध्ये रूपांतरण किंवा कर्ज आहे. ते म्हणाले, “आम्ही घाबरणार नाही आणि झुकणार नाही, आम्ही खंबीरपणे लढू. हा राजकीय लढा आहे. काही दिवसांपूर्वी समन्स पाठवण्यात आले होते. गरज पडल्यास सोनिया गांधी नक्कीच जातील. आम्ही ईडी कडून उत्तर देण्यासाठी वेळ मागितला असल्याचेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र काय आहे ?

सुरजेवाला पुढे म्हणाले की, ब्रिटीश राजवट उखडून टाकण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1937 मध्ये नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र काढले, ज्याचे नेते महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरकार पटेल, पुरुषोत्तम दास टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई आणि इतर होते. . ब्रिटिशांना या वृत्तपत्राचा एवढा धोका वाटला की त्यांनी 1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनात नॅशनल हेराल्डवर बंदी घातली, जी 1945 पर्यंत चालली. “स्वातंत्र्य चळवळीचा आवाज” बनलेल्या या वृत्तपत्राचा मूळ मंत्र होता,  “स्वातंत्र्य धोक्यात आहे, सर्व शक्तीनिशी त्याचे रक्षण करा.” मात्र मोदी सरकार चळवळीचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचत असून स्वतः नरेंद्र मोदी या कटाचे प्रमुख आहेत आणि हि कारवाई अंमलात आणण्यासाठी ईडी हे त्यांचे ‘आवडते आणि पाळीव शस्त्र’  आहे.

परंतु मोदी आणि भाजपने हे लक्षात घ्यावे कि , नॅशनल हेराल्डचा स्वातंत्र्य चळवळीचा आवाज आहे तो कोणीही रोखू शकणार नाही, ना सोनिया गांधी आणि राहुल गांधींना हे सरकार घाबरवू शकणार आहे. काँग्रेसचे नेतृत्व निर्भय आणि अविचल आहे. अशा डावपेचांना घाबरून नतमस्तक होणारे नव्हे  तर छाती ठोकून लढणारे आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचा मूळ मंत्र आजही तितकाच समर्पक आहे.”

https://twitter.com/ANI/status/1531938391016673280

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची काँग्रेसवर टीका

दरम्यान काँग्रेसच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्तर देताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. एएनआय  वृतसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत नड्डा यांनी,  तुम्ही कधी गुन्हेगाराला ‘मी गुन्हेगार आहे’ असे म्हणताना पाहिले आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे ते (सोनिया गांधी-राहुल गांधी) आपल्यावर झालेले आरोप नाकारणारच.

“आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ते रद्द व्हावे , यासाठी आपण न्यायालयात जातो, परंतु त्यांनी जामीन मागितला. याचा अर्थ ते दोषी आहेत” असे  विधान जेपी नड्डा यांनी केले आहे.

इतर नेत्यांवरही आरोप

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनीही  सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता हडप  केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. दरम्यान यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

खा. संजय राऊत यांची भाजप आणि सरकारवर टीका

या ईडी प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजप आणि केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे कि , जर हे असेच  सुरू राहिले  तर एक दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मारकावरही  ईडीची नोटीस चिटकवलेली दिसेल,  हेही दिवस बदलतील, हेही दिवस जातील.

‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरण काय आहे ?

‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!