Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अफगाणिस्तानात शांततेसाठी तालिबांकडून प्रयत्न

Spread the love

काबूल : अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेऊन १० दिवस उलटल्यांनंतरही तालिबानने पंजशीर व्हॅली वगळता जवळपास सर्वच प्रांतावर आपला ताबा मिळवला आहे. विशेष करून पंजशीर याठिकाणी तालिबानला नॉर्दर्न आघाडीकडून कडवे आव्हान दिले जात आहे. त्यामुळे पंजशीर याठिकाणी मोठा हिंसाचार घडल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. यानंतर आता संबंधित दोन्ही गटात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबान आणि नॉर्दन आघाडीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

तालिबान आणि पंजशीरचे प्रतिनिधी यांच्यात परवान प्रांताची राजधानी चारीकर याठिकाणी एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला न करण्याला (सीजफायर) सहमती दर्शवली आहे. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानच्या वतीने या चर्चेचे नेतृत्व मौलाना अमीर खान मुक्तई यांनी केले आहे. तसेच तालिबानने या बैठकीला ‘अमन जिरगा’ असे नावही दिले आहे. त्यामुळे येत्या काळात अफगाणिस्तानातील हिंसाचार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. संबंधित बैठकीत पंजशीरच्या नॉर्दन आघाडीचे नेतृत्व माजी अफगाणिस्तान कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद यांनी केले आहे. स्वयंघोषित काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्ला सालेह देखील या बैठकीत उपस्थित होते. दोघेही तालिबानच्या विरोधात नॉर्दर्न आघाडीच्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

तत्पूर्वी, अहमद मसूद यांनी म्हटले आहे की, काहीही झाले तरी तालिबानला शरण जाणार नाही, पण त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे. याबाबत मसूद यांची एक मुलाखत बुधवारी फ्रेंच मासिकात प्रकाशित झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत मसूद यांनी म्हटले की, ‘मी आत्मसमर्पण करण्यापेक्षा मरणे पसंत करेन. मी अहमद शाह मसूदचा मुलगा आहे. माझ्या डिक्शनरीत आत्मसमर्पण हा शब्दच नाही.’ दरम्यान बुधवारी पंजशीरसाठी जाणारे अन्न आणि इंधनाचा पुरवठा बंद केल्याचे वृत्त समोर आले होते . पण आज तालिबानकडून ही बाब फेटाळून लावली आहे. काबूल विमानतळावर पुन्हा चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या १० दिवसात काबूल विमानतळावर गोळीबार आणि चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!